Facets
Spiti Valley : Everything is Beautiful #2
spiti-valley-blog-2-img

डोगरा कुटुंबातील सर्वाच्या बरोबर सकाळी फोटो काढले. खुपछान कुटुंब आहे. मोठा व्यवसाय आहे. पण अदबीने वागणारी माणसे आहेत. हटू व्हॅली नावा बरोबरच कायमची मनावर कोरली गेली आहेत.

ईकडे उपलब्ध फळे म्हणजे सफरचंद, चेरी, आलूबुखार, जर्दाळू, पीच वगैरे. हंगाम सुरू असल्याने आम्हाला रस्त्यावर ही सर्व फळे मिळाली. एकदम ताजी व स्वस्त. त्यामुळे वाया जातील एवढी खरेदी केली. आज आम्ही रामपुर मार्गे सांगला येथे जाणार होतो. घाटात, अगदी रस्त्यावर, समोरच गिधाडे पहायला मिळाली. पुर्वी वेताळटेकडीवर खाणीतील पाणी पिण्यासाठी येत असत. तेव्हा मुलाला दाखवायला घेऊन जात असे. आता पहायला मिळत नाहीत. गिधाडे हे समृद्ध निसर्गाचे लक्षण आहे. ईकडे, बहुतेक निरुपयोगी पाळीव जनावरे मोकाट सोडून देत असावेत. ती काही कारणांनी रस्त्यावर मरतात. व गिधाडांना खाद्य मिळते.

वाटेत कुमार सैन गाव आहे. पुढे रामपुर हे गाव आहे. आपला प्रवेश सतलज नदीच्या व्हॅली मधे होतो. एके ठिकाणी डोंगरावरून सुटे दगड गोटे खाली ढकलण्याचे काम सुरूहोते. त्यामुळे सतलजचे काही फोटो काढणे शक्यझाले. एकॳ ॅंब्युलन्स आल्या मुळे आम्हाला रस्ता मिळाला. जेओरी पासून एक फाटा सराहन (जुने नाव शोणितपूर) येथे जातो. वाणासुर, भक्त प्रल्हाद यांचा नातू, व नंतर भगवान श्रीकृष्ण यांचे पुत्र प्रद्युम्न हे येथील राजे होते. सराहन येथे भीमकाली उर्फ भीमदेवी मंदिर आहे. ५१ शक्तीपीठा पैकी हे एक मंदिर आहे. माजीमुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे येथील बुशैहर राजघराण्यातील. सर्वजण आदराने त्यांचा उल्लेख राजासाब म्हणून करतात. व तेच या देवीचे भक्त व पुजारी. कारण पुजेचा मान राजघराण्यातील लोकांचाच आहे. तसे वेगळे पुजारीआहेतच. किन्नोर चे प्रवेशद्वार म्हणून हे गाव ओळखले जाते. बशहर Bushahr kingdom साम्राज्याची ही उन्हाळ्यातील राजधानी होती. रामपुर हिवाळ्यातील. ईकडच्या सर्वच मंदिरात हिंदू व बौद्ध पध्दतीने व परंपरेने पुजा केली जाते. ईथे दोन मंदिरे आहेत. एक जुने व दुसरे तुलनेने नवीन. बाहेर नृसिंह मंदिर व भगवान शंकरयांची मंदिरेआहेत. बाहेर राजघराण्याचे महाल आहेत. पण आत जायला परवानगी नाही. एका छोट्या हॉटेल मधिल जोडप्याने आम्हाला छान जेवण दिले. आम्ही पुढे मार्गस्थ झालो.

नवीन प्रदेश होता. व आपल्या पेक्षा वेगळा निसर्ग आहे. काल व आज त्याचा अनुभव घेतच होतो. हिमालयात बरेच प्रवास, ट्रेक झाले. व प्रत्येक भेटीनंतर आकर्षण वाढतच आहे. प्रत्येक भागाचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे उत्तराखंड मधे देवस्थान जास्त आहेत. नैनिताल सारखी पर्यटन स्थळे आहेत. पण बहुतांश लोक हे तीर्थ यात्रा व देवदर्शन करायलाच उत्तराखंड मधे जातात. नेपाळचा हिमालय हा अधिक भव्य व रौद्र आहे. ईकडे साहसी लोक जास्त जातात. भुतानचा हिमाचल बौद्ध मठ व सुंदर निसर्ग बघण्यासाठी आहे. तिकडे फिरण्यावर नियंत्रण आहे. प्रत्येक क्षेत्रा करीता निराळी परवानगी लागते. लेह लडाख म्हणजे रौद्र सौंदर्य. बोडके डोंगर व हिमनद्या. उंच भागातील उरात धडकी भरवणारे रस्ते. अरुणाचल मधे अजुनही नियमित बर्फ. पण हिमाचल प्रदेशात दोन भाग आहेत. एक लोअर हिमाचल व दुसरा अप्पर हिमाचल. अप्पर मधे लोकसंख्या कमी. लेह प्रमाणे बोडके डोंगर. अवघड रस्ते. हिमशिखरे. हिमनद्या. २०१४ नंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ईकडे डांबरी रस्ते केले. अन्यथा खडकाळ रस्त्यावर गाडी चालवावी लागायची.

परंतु एक गोष्ट जाणवते. सर्वच हिमाचल खुप सुंदर आहे. वैविध्य आहे. व ते जाणवल्यास जबरदस्त आकर्षण निर्माण होते. प्रवासाची वेळ संपते पण तृप्ती येत नाही. व पुढची टुर कधी याची उत्सुकता निर्माण होते. सरहान हून पुढे निघालो. वाटेत गाडी थांबली. समोर “किनौर पुलिस आप का हार्दिक स्वागत करती है|” असा फलक. आमचा सारथी व मी दोघेजण चौकीत गेलो. प्रवाशांची रीतसर नोंद केली जाते. सर्व माहिती दिली. ईकडे रस्ता अवघड आहे व अपघात होतात. असे दिपकने सांगितले. ईकडे सतत घाट रस्ता असतोच. मग अशी नोंद कशासाठी? हा विचार मनात आला.

spiti-valley-02-blog-inside-img-01

गाडी काही अंतर पुढे गेल्यावर लक्षात आले. समोर डोंगर कोरुन रस्ता काढला आहे. सरळ कडा आहे. तो पोखरून रस्ता केला आहे. व रस्ता अरुंद देखील आहे. वरुन कधीही दगड, धोंडे खाली येतात. नेहमी येत असल्याने दिपकला सुरक्षित जागा माहिती आहे. त्या ठिकाणी त्याने गाडी उभी केली. अवाक होऊन व रस्त्याचे काम बघून आम्ही फोटो काढले.

ईथे एका अपघाताची घटना दिपकने सांगितली. हिमाचल प्रदेश ची एक बस चालली होती. एका वळणावर ड्रायव्हरने बस थांबवली व तो आणि कंडक्टर वळणावरुन पुढे रस्ता कसा आहे हे बघायला चालत पुढे गेले. रस्ता चांगला होता. ते बघून दोघे परत आले तर जागेवर बस नाही. एवढी मोठी बस गेली कुठे ? ते अजून एक वळण मागे गेले. बसचा मागमूस नाही. दोघेही चक्रावले. जिथे बस थांबवली होती तिथे आले व खाली दरीत लक्ष गेले. एका क्षणात अंगावर शहारे आले. बस खाली दरीत कोसळली होती. वरुन एक दगड सुटला व एकाच धक्क्यात बस सह खाली दरीत गेला. त्यामुळे ईकडे सगळे जण देव व दैव, दोन्ही वर विश्वास ठेवतात. ही जागा अपघाती आहे. व म्हणून किनौर पुलिस सर्व प्रवाशांची नोंद ठेवतात.

किनौर. Kinnaur – The Land of Apples and Gods. Kinnaur is called “Khunu” by Tibetans and in Leh, this area is called Maon. Maon has also been the name of Bushahr state.

किन्नर लोकांची वस्ती म्हणून किन्नौर. किन्नर म्हणजे जे कला, गायन, नृत्य, संगित व नाट्य कलेत निपुण असलेले लोक. पांडव अज्ञातवासात येथे किन्नर बनून राहिले होते. कृष्ण पुत्र प्रद्युम्न हा येथील राजा होता. कुमार संभव मधे कालिदासाने किन्नरांचा उल्लेख केला आहे. किन्नौर कैलास हा येथील महत्त्वाचा व पवित्र पर्वत आहे. ६०५० मीटर म्हणजे १९८५० फुट उंचीचे हे शिखर पाच कैलासांपैकी एक आहे. कैलास मानसरोवर, ओम पर्वत, श्रीखंड कैलास, किन्नौर कैलास व मणी महेश कैलास असे पाच कैलास आहेत. पैकी तीन हिमाचल प्रदेशात आहेत. कैलास मानसरोवर तिबेटमध्ये व ओम् पर्वत उत्तराखंड च्या गढवाल भागात आहे. ही डोंगररांग किन्नर कैलास म्हणून ओळखली जाते. याच पर्वतावर, मुख्य शिखरा शेजारी अद्भुत असे शिवलिंग आहे. ७९ फुट उंचीचे हे शिवलिंग सतत आपला रंग बदलत असते.

Difficult road often lead to beautiful destination. To give up a difficult path means to give up the glory and honour that will be achieved by overcoming these difficulties!

भाबानगर चौकी सोडून पुढे आलो. सांगला कडे जाताना भव्यता, सृष्टी सौंदर्य, अवघड रस्ते, सगळे बघत रहावे असे आहे. सतलजचे खोरे व दरी या उंचीवरून सुंदर दिसते. आता कदाचित सवयीने असेल पण या उंचीची भिती वाटत नव्हती. दुसरे श्रेय जाते ते आमच्या मार्गदर्शक दिपकला. अतिशय सुरक्षित पध्दतीने गाडी चालवत होता. सोबत बरीच माहिती होती. तरीही वाटत की आपल्याकडे प्रत्येक राज्यात अशा लोकांना थोडं तरी प्रशिक्षण द्यायला हवे. म्हणजे ते अधिक माहिती सांगतील. वाटेत करचम Karcham येथे दोन रस्ते लागतात. एक कल्पा Kalpa कडे जाणारा. दुसरा सांगला व चिटकुल कडे. करचम ईथे धरण आहे व वीजनिर्मिती प्रकल्प आहे. ३३२ फुटांची भव्य भिंत व त्याच्या मागे साठलेले हिरवेगार पाणी पाहून बसुन रहावेसे वाटते. ईथुन आपण सतलज सोडून सतलजची उपनदी बास्पा नदीच्या खोऱ्यात शिरतो. ईकडे नद्यांची नावे फक्त बदलतात. पण प्रत्येक दरीचे किंवा खोऱ्याचे सौंदर्य अप्रतिम आहे.

संगला. Sangla. Welcome to Tukpa valley. ग्रामपंचायत कामरु. पर्वताच्या पायथ्याशी संगला व डोंगरावर कामरु ही गावं आहेत. दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत. ९५०० फुटांवर वसलेले गाव आहे. संध्याकाळी मुक्कामाला पोहोचलो. समोर भव्य पर्वत आहे. हा पर्वत म्हणजे किन्नर कैलास. कल्पा च्या विरुद्ध बाजूला. बघत रहावा असा. निळसर. नकळत हात जोडले गेले.

3 thoughts on “Spiti Valley : Everything is Beautiful #2

  1. खुप छान वर्णन केलं महरावजी. तुम्ही ग्रूपवर छान छान फोटो टाकलेत. ते सर्व फोटो बघून आणि तुमचा लेख वाचून खुप माहिती मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *