Travelling is a brutality. It forces you to trust strangers and to lose sight of all that familiar comfort of home and friends. You are constantly off balance. Nothing is yours except the essential things – air, sleep, dreams, the sea, the sky – all things tending towards the eternal or what we imagine of it
हिमालय ही देवभूमी. या देवभुमीतील स्वर्ग भुमी भारतात आहे. नुसत्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ही देवभूमी नाही. तर या सौंदर्याच्या जोडीला अनेक धर्मातील लोकांनी केलेल्या तपश्चर्येचे योगदान आहे. असंख्य वर्षे व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथे राहून मानवी वस्ती टिकवणाऱ्या आपल्याच बांधवांचे योगदान आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या फार जवळ गेलो तरच किंवा एखाद्याच्या अंतरंगात डोकावून पाहू शकलो तर आणि तरच आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती होते. देशाचे, निसर्गाचे देखील असेच आहे.
The more you know, the more you realize you don’t know or the more you know how much less you know
भारताचे देखील तसेच आहे. बहुतांश लोक आपला देश न बघताच आपल्या देशात बद्दल आपले मत बनवतात. व बरेचदा ते नकारात्मक असते. पण जे सतत भटकतात, जे लोक भारत बघतात, त्यांना सतत नाविन्यपूर्ण भारताचे दर्शन होते. हिमालयाचे तसेच आहे. प्रथम दर्शनातच हिमालयाचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले. व प्रत्येक भेटीत हे आकर्षण वाढतच गेले. भव्यता, सौंदर्य, रौद्रता, प्रचंड वृक्ष, बुग्याल व बोडके डोंगर व त्याच्या वरती हिमच्छादित शिखरं. धबधबे, वाहत्या निळसर नद्या, नाले. उसळते पाणी. व त्याच बरोबर एक तटस्थ, गंभीर, गुढ, शांत व रहस्यमय वातावरण देखील आकर्षण निर्माण करते. असे मानले जाते की मानवाने अद्याप पाच टक्के देखील हिमालय पाहिलेला नाही. आणि खरंतर मला हा मानवजातीवर उपकारच वाटतो. कारण आपल्या दृष्टीने दुर्लक्षित हिमालयच जास्त बघण्यासारखा आहे. या भागात भगवान शंकर यांचाच प्रभाव जास्त आहे. तसेच बौद्ध धर्माचा देखील प्रभाव अनेक दशके आहे. हिंदू धर्म व बौद्ध धर्मात अनेक समान गोष्टी आहेत. व भगवान शंकर, विष्णू, ब्रम्हदेव व गुरु पद्मसंभव हे देखील एकमेकांशी जोडलेले आहेत. पण हा इतिहास पुण्यात बसून समजत नाही. त्यासाठी भटकावेच लागेल. देश बघावा लागेल. माणसांच्या बरोबर बोलावे लागेल. एका अर्थाने वाचायला शिकावे लागेल.
Don’t be that person who is too busy when you are young and then too tired when you are old
लेह लडाख, मणी महेश, मनाली वगैरे प्रदेशात फिरताना अनेकदा ऐकलेले व मनात भिनलेले नाव, लाहौल स्पिती व्हॅली. काही कारणांनी ईकडे जाणे जमत नव्हते. व प्रत्येक वेळी आकर्षण वाढतच होते. छोटा तिबेट किंवा कोल्ड डेसर्ट म्हणून ओळखला हा प्रदेश. स्पिती (तिबेटी: स्पीति) नावाचा अर्थ “मधली जमीन” (middle land) आहे: भारत आणि तिबेट आणि खोऱ्यातील जमीन, खाब येथे सतलजमध्ये सामील होण्यापूर्वी स्पिती नदी आणि तिच्या उपनद्यांद्वारे कापली गेली जाते. स्पिती लाहौलला जोडूनच आहे पण स्पितीचा भूभाग, हवामान आणि वस्तीच्या बाबतीत लाहौलपेक्षाही कठीण आहे. रुदयार्ड किपलींग यांच्या शब्दांत लाहौल स्पिती म्हणजे A world within a world.
Spiti Valley (spyi ti) (pronounced as Piti in Bhoti Language).
And Lahaul (gar zha). The word Lahaul is derived from Tibetan word LHO-YUL means meaning “Country in the south.” Another meaning of LHAHI-YUL stands for “Country of God’s”.
एकदा प्रवास निश्चित झाल्यावर मी काही माहिती गोळा करायला सुरुवात केली. थोडीफार माहिती असेल तर बघायला मजा येते व लक्षात देखील राहाते. लाहौल व स्पिती असा एकच जिल्हा आहे. पण निसर्ग अत्यंत भिन्न आहे. लाहौल हिरवागार आहे. फळफळावळ, भाजीपाला भरपूर. तर स्पिती मधे नुकतीच सुरू झालेली सफरचंदाची लागवड दिसते. बाकी झाडी नाही. पाऊस अगदी कमी. भरपूर बर्फवृष्टी. तरीही दोन्ही विभाग खुपच सुंदर. पुणे चंडीगड फ्लाईटने सकाळी विमानतळावर आगमन झाले. कारण नसताना आम्ही विमान कंपनीच्या सांगण्यावरून rtpcr सर्टिफिकेट घेऊन गेलो होतो. विमानतळावर कोणीही चौकशी करत नव्हते. आमचा गाईड व मार्गदर्शक व गाडीचा चालक मालक दिपक ची गाठ पडली. नवीन ईनोव्हा क्रिस्टा गाडी होती. दिपकला पाहिल्यावर नजरेत भरला तो त्याचा रापलेला चेहरा. प्रवासाचा अनुभव त्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसत होता. नमस्कार व ओळख झाल्यावर त्याचे पहिले वाक्य होते की ” स्पिती बहुत सुन्दर है| आप जैसे आगे बढोगे वैसे वैसे आप ज्यादा सुंदर निसर्ग देखोगे!” दिपकचा उल्लेख पुढे येतच राहिल. पण आम्हाला खात्री पटली की आम्हाला भरपूर माहिती मिळेल. सकाळची वेळ असल्याने गर्दी नव्हती. व चंडीगडचे रुंद रस्ते, यामुळे आम्ही लवकरच शहराच्या बाहेर पडलो. लवकरच आपण हिमाचल प्रदेशात प्रवेश करतो. दोन तासात सोलन गाव लागले. कालच म्हणजे २० जुनला बातम्या बघताना सोलन मधिल एक दुर्घटना बघीतली होती. एका हॉटेलची केबल कार अडकून पडली होती. दहा बारा नागरिक अडकले होते. समोरच ती केबल कार त्याच अवस्थेत होती. काल बातम्या बघताना मनात सुद्धा विचार नव्हता की बारा तासात ही जागा आपण प्रत्यक्ष बघू.
प्रदेश बदलल्याची पहिली खुण म्हणजे ब्रेकफास्ट चे पदार्थ. उत्तरभारतात पराठे हा नित्य न्याहारीला उपलब्ध पदार्थ आहे. चंडीगड सोडलं की आपल्याला शिवालिक पर्वत रांगा दिसायला लागतात. याच पर्वत रांगा मधे आपला प्रवास सुरू होतो. आधी सोलन, मग सिमला. पण मनातील चित्र व प्रत्यक्ष यात खुप तफावत आहे. म्हणजे मला वाटली. खुप गर्दी, वाहतुकीने तुंबलेले रस्ते, जंगल कापून उभे राहिलेले शहर वगैरे पाहून वाईटच वाटले. अर्थातच आम्हाला न थांबता पुढे जायचे होते. तरीही सिमल्याची गर्दी पाहून वाईट वाटले. त्यापेक्षा. दिड दोन हजार वस्तीचे खुफरी हे गाव उत्तम आहे. Kufri उच्चार पण लिहिताना देवनागरी मधे खुफरी असे लिहितात. खुफरी नंतर नारकंडा हे ८८८५ फुटांवरचे गाव आहे. हजारच्या जवळपास वस्ती आहे. त्यामुळे शांत आणि सुंदर आहे. पण आम्ही गावात न थांबता हटू देवी मंदिर पहायला गेलो. खरंतर नारकंडा सोडल्यावर आमची टुर खऱ्या अर्थाने सुरू झाली. गजबजाटातून बाहेर पडलो. निसर्गरम्य वातावरणात प्रवास सुरू झाला. प्रवासाचा मुळ उद्देशच वेगळ्या दुनियेत जाणं हा असायला पाहिजे. स्वतःशी जोडणे, निसर्गाशी जोडणे हेच प्रयोजन पाहिजे. या सर्व अनोळखी प्रदेशात स्वतःला विसरायला झालं तरच प्रवासाला अर्थ आहे. We must leave all our comforts behind. स्थानिक अन्न व निवारा प्रवासात महत्वाचा असतो. नारकंडात प्रवेश केल्यावर या भागाचे वेगळेपण जाणवले. काही दशकांपूर्वी सिमल्यात ते जाणवत असेल. म्हणून सिमला प्रसिद्ध झाले.
नारकंडा गावातून बाहेर निघताना दिपकने आम्हाला हटू देवी मंदिर पहायला जायचे आहे असे सांगितले. आमचे या ट्रिपचे पहिले साईट सिईंग. Sight seeing. कधीकधी काहीच माहिती नसलेली चांगली असते. दिपकने गाडी एका अरुंद अशा रस्त्यावर घातली. हटू मंदिर ५ किलोमीटर असा फलक दिसला. एक गाडी कशीबशी जाईल असा अरुंद रस्ता. पहाडातील ड्रायव्हरांची खरच कमाल वाटते. समोरुन मोठी बस आली तरी विचलित न होता मागे पुढे गाडी नेत ते वाट काढतात किंवा वाट देतात. एक शिकवणच आहे. पहिल्या दिवशी १११५२ फुटांवर आम्ही पोहोचलो. समोर हटू देवी मंदिर होते. हिरव्यागार वनराई मधे हे सुंदर लाकडाचे व काचेचे मंदिर आहे. इकडची सर्वच मंदिर ही पॅगोडा प्रकारची असतात. बर्फवृष्टी मुळे असे आकार दिले आहेत. हटू देवी म्हणजे मंदोदरी. रावणाची पत्नी. तिचे हे मंदिर आहे. हिमाचल व पांडवांचे खुप जवळचे नाते आहे. अनेक ठिकाणांशी त्यांच्या कथा जोडलेल्या आहेत. हटू पर्वतावर पांडव अज्ञातवासात राहिले होते. ईथे दोन मोठे खडक आहेत. या खडकांना “भीम चुल्हा” म्हणून ओळखले जाते. अज्ञातवासात भीमाने बल्लवाचार्य रुप धारण केले होते. थोडे पुढे गेल्यावर हटू शिखर आहे. ढग नसतील तेव्हा हिमशिखरे दिसतात. प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीखंड कैलास. सर्वत्र देवदार वृक्ष आहेत. आमच्या प्रवासाची सुरुवात छान झाली होती. एकतर अचानक आम्ही उंचीवर आलो होतो. व त्यामुळे एक तास, १११५२, फुटांवर काढलेला एक महत्त्वाचा होता. वातावरणाशी समरस होण्यासाठी.
दर्शन घेऊन आम्ही आजच्या मुक्कामी निघालो. Hatu valley home stay. निसर्गाच्या कुशीत असेच वर्णन करावे, असा हा होम स्टे आहे. Home stay ची संकल्पना महाराष्ट्रात फारशी परिचित नाही. कोकणात काही ठिकाणी ही पध्दत आहे. ही छोटी लॉज असतात. व मालक स्वतः बऱ्याच सेवा पुरवतात. हटू व्हॅली होमस्टे असेच एक उत्तम लॉज आहे. निवांत, निसर्गाच्या कुशीत. ईशान डोग्रा व त्यांची पत्नी हा व्यवसाय चालवतात. डोग्रा हे पुर्वीचे या भागाच्या राज्यकर्त्यांचे नाव. सभोवताली सफरचंदाच्या बागा. चेरीची झाडे. व इतर ही फळफळावळ. अगदी आपुलकीने व अदबीने वागणारी माणसे! अगदी याच अपेक्षेने मी ही टूर करायचे ठरवले होते. मुंबई, पुणे येथुन चारपाच दिवस ईथे येऊन रहायला पाहिजे, असे ठिकाण आहे. No TV. Mobile is our option. ईशान मुळे आम्हाला चेरीची फळं खायला मिळाली. या फळांचा ठोक विक्रीचा स्थानिक दर ५० ते ५०० रुपये प्रतिकिलो आहे. शक्यतो सर्वफळं, भाज्या दिल्ली व परदेशी जातात. या दर्जाच्या चेरी आम्ही प्रथमच खाल्या. स्पिती व्हॅली, ला हौल व्हॅली या स्वप्नसृष्टी मधे प्रवेश करण्यापूर्वी हिमाचलमधे आमचे छान स्वागत झाले होते. या पुढील दहा दिवस आम्ही असाच पाहुणचार घेणार होतो. संध्याकाळी तीनचार किलोमीटर पायी चक्कर मारली. शक्य होईल एवढे अनुभव घ्यायचे, असा माझा विचार असतो. हा तर पृथ्वीचा स्वर्ग. अपवाद कसा ठरणार?