आपण शहरात राहतो, रोजचं आयुष्य जगतो ते घड्याळाच्या काट्यावर, तारीख, वार, महिन्यानुसार. निसर्गाचं घड्याळ कुठं असतं? त्याची टिकटिक आपल्याला ऐकू यते का?
शहरात कुठले प्रहर वगैरे कळायला? असं आपल्याला वाटतं. पण नीट पाहिलं तर ते सगळं चक्र अगदी शहरात सुद्धा दिसतं, कळतं निसर्गगान अविरत सुरु असतं. ते आपल्या कानावर पडतं पण चित्त एकाग्र असलं तरंच कानांना ऐकू येतं. हळूहळू नजरेला दिसायला सुद्धा लागतं. कधी अलगद आत खोलवर पोचतं, कधी घरंगळूनही जातं. निसर्गाची स्वयंभू लय असते, त्या लयीत ऋतुचक्र एका विशिष्ट गतीने फिरत असतं. स्वतःच्याच नादात.
ऋतू कसे अलवार येतात जातात…त्यांना ताल असतो, नाद असतो..अनाहत नाद ऋतू अवतरतात त्याआधी अवघ्या सृष्टीला त्यांची चाहूल लागते. या हळुवार बदलांचं प्रोजेक्शन झाडांवर झालेलं आपल्याला स्वछ दिसतं. असं वाटतं ऋतू झाडांचा आरसा करुन त्यात आपलं रुप न्याहाळतात! झाडं पण कशी अगदी घड्याळ लावल्यासारखी फुलतात! ऋतूंनुसार झाडांचं रुप पालटतं तसं पक्षांचं येणंजाणं पण बदलत. हिवाळ्यात रोज ऐकू येणारी दयाळ पक्ष्याची सुरेल लकेर थंडी सरायला लागते तशी कमी होत जाते आणि एक दिवस ऐकू येईनाशी होते. दयाळांची जागा आता भारद्वाज घेतात.
कुककुक, घुगघुग असा घुमारदार आवाज आजूबाजूच्या झाडांतून यायला लागला की ओळखावं आता लवकरच महाशिवरात्र येणार, भल्या पहाटेच बुलबुलांच्या मंजूळ गप्पा सुरु होतात. शेवग्याच्या फुलांवर बागडणारे शिंजीर, भुंगे, फुलपाखरं वगैरे मंडळी उन्हं तापायाच्या आत पळ काढतात.
शेवग्याच्या पोसलेल्या लोंबत्या शेंगांवर पोपट झोके घेऊ लागतात. संध्याकाळी टेकडी चढताना मधल्या माळावर पिवळ्या चोचीच्या,स्टायलिश केसांच्या माळटिटव्या दिसतात. चारपाचच्या गटाने माळावर तुरुतुरु चालत मन लावून गवताच्या बिया टिपत असतात. त्यांच्या टप्प्यात आपलं पाऊल चुकून पडलंच तर लगेच भुर्र्कन उडून पलीकडे जाऊन बसतात. टेकडीवर लालजर्द पांगारा तर कधीचा फुललाय. पांगाऱ्याच्या सुरेख कळीदार फुलांमधला मधुरस प्यायला पक्ष्यांची कोण लगबग सुरु असते. काहींनी तर चक्क फुलांमध्येच ठाण मांडलेलं असतं .
नखशिखांत बहरुन आलेला लालकेशरी पळस तर होळीच्या आधीच रंगपंचमी खेळत असतो! पळसाच्या रंगरुपावर लिहिल्या गेलेल्या उत्कट आणि अजरामर काव्याने साहित्यसृष्टी सुद्धा तितकीच बहरलीय. त्याच्या मनमोहक रंगात माणसं रंगून गेली नसती तरच नवल. उन्हं उतरतात, सूर्याची किरणं मऊ सोनेरी होतात. मावळतीला रंगांची उधळण होते. दिवसाचा प्रहर बदलतो तसा निसर्गही आपला स्क्रीनसेव्हर बदलतो. हलके हलके तिन्हीसांजा होऊ लागतात. चांदण्या येऊ की नको करत निळसर गुलाबी आकाशाच्या पाटीवर पुसटशा उमटायला लागतात. सोसायटीत मुलांच्या खेळाचा नेहमीचा गोंगाट शिगेला पोचलेला असतो, त्यातच पक्षांचं, माणसांचं घरट्यात परतणं सुरु होतं… बुलबुल, चिमण्या अखंड चिवचिवत असतात. काळोख पडायच्या आत बांबूच्या जाळीत सुरक्षित आसरा शोधून मुरुन बसायला धडपडत असतात.
वातावरणात एकच कोलाहल असतो…मुलांचा..पक्षांचा..आणि एका क्षणी सगळं एकदम शांत होतं. निरव शांतता पसरते. पक्षी चिडीचूप होतात. त्या शांततेलाही एक गहिरा नाद असतो. प्रहर बदलत असतो. संध्याकाळ गर्द होत जाते.
Nice article
विचार करायला लावणारे article. Photos जवळपासच्या परिसरातील आहेत का? सुरेख आहेत.