Ancient Indian Science
भारतीय तत्वदर्शन आणि सृष्टीची उत्पत्ती : भाग १
bhartiy-tatvadarhan-srushti-utpatti-part-1-blog-img-02

सृष्टीची उत्पत्ती कशी झाली याबाबत आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये Big Bang Theory हा विसाव्या शतकात मांडलेला सिद्धांत स्वीकारला जातो. या सिद्धांतानुसार सुमारे १३.८ अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व एका बिंदूसमान होते. आकाराने अतिशय छोटे. या बिंदूचा स्फोट झाला आणि त्यातील सर्व द्रव्य अवकाशात फेकले गेले. त्यातूनच मूलकणांची निर्मिती झाली. स्फोटानंतर बिंदूचे प्रसरण होत गेले आणि प्रसरणाची प्रक्रिया चालूच राहिली. महास्फोटानंतर बाहेर पडलेल्या ऊर्जेतून वस्तुमान (आणि पदार्थही) कसे निर्माण झाले हा प्रश्न आहे. स्फोटानंतर सेकंदाच्या आत मूलकणही निर्माण झाले. वस्तुमान आणि मूलकणाचे स्वरूप या दोन्हींच्या अभ्यासासाठी जगभरातील शास्त्रज्ञ एकत्र येऊन युरोपमधील ‘सर्न’ प्रयोगशाळेत प्रयोग करीत आहेत.

‘सर्न’च्या या प्रयोगामुळे ‘बिग बँग’ सिद्धांतावर शिक्कामोर्तब झाल्याचे काही खगोलशास्त्रांचे म्हणणे असले, तरी महास्फोट होण्याच्या आधी काय स्थिती होती, मुळात हा स्फोट झाला कसा आदी अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. विसाव्या शतकात मांडल्या गेलेल्या महास्फोटाच्या सिद्धांताविषयी अर्थात Big Bang Theory विषयी आपल्याला सर्वसाधारण माहिती तरी नक्की असते.

प्राचीन भारतीय दर्शनांमध्ये सृष्टीच्या उत्पत्ती विषयी जो विचार सिद्धांत मांडलेला आहे त्याची आपल्याला अजिबात माहिती नसते. आणि कोणी जर याविषयी सांगू लागले तर ती माहिती खोडून काढण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. कारण यालाच आधुनिक असणे समजले जाते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याविषयी किमान माहिती असणे हे निसर्गाकडे बघण्याचा प्राचीन भारतीय दृष्टिकोन समजून घेण्यासाठी तरी, खूपच आवश्यक आहे.

ऋग्वेद आणि वैशेषिक दर्शनामध्ये सृष्टीची उत्पत्ती आणि विश्वाची रचना याबाबत जी काही गहन आणि तर्कशुद्ध चर्चा करण्यात आलेली आहे ती विस्मयचकीत करणारी आहे. प्राचीन ऋषीमुनींच्या शास्त्रशुद्ध आणि मार्मिक विचारांनी आपण अक्षरशः थक्क होऊन जातो. सृष्टी आणि निसर्गाविषयी जे काही तटस्थ ज्ञान आहे ते केवळ आधुनिक विज्ञानामध्येच आहे, असा जो काही आज आपला समज करुन देण्यात आलेला आहे त्याला हे प्राचीन ज्ञान पूर्णतः छेद देते.

मानवी इतिहासात विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी जे अनेक सिद्धान्त मांडले गेले आहेत त्यातील “नासदीय सूक्त” हा सर्वात प्राचीन सिद्धान्त असावा. विश्वाच्या उत्पतीच्या अंगाने प्रश्न उपस्थित करून त्यासंबंधी काही तर्कसिद्धान्त या सूक्तात मांडले आहेत. या सूक्ता मधली “कल्पनाशक्ती” व अज्ञाताचा शोध घेऊ पाहणारी रचनाकर्त्यांची “प्रतिभा” यासाठी हे सूक्त नावाजलेले आहे.

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील १२९व्या सूक्ताची सुरुवात ‘नासदासीत्’ ह्या शब्दाने होत असल्याने त्याला नासदीय सूक्त असे नाव मिळाले आहे. केवळ सात ऋचांच्या ह्या लहानशा सूक्तात सृष्टीच्या पूर्व स्थितीचे (सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल) मार्मिक विचार मांडलेले आहेत. हे सूक्त त्रिष्टुप छंदात आहे. देवता हे भाववृत्त आहे.

ऋषी म्हणतात, सृष्टीची निर्मिती होण्यापूर्वी “सत्” किंवा “असत्” दोन्ही नव्हते. अंतरिक्ष आणि आकाशही नव्हते. मृत्यूही नव्हता आणि अमृतत्वही नव्हते. रात्र आणि दिवस असा भेद नव्हता. सर्वांना आवरण घालणारे असे एक तत्त्व होते. संपूर्ण जग अंधाराने वेढलेले होते, सर्वत्र पाणी होते. त्या वेळी स्वतःच्या तपःसामर्थ्यावर एक तत्त्व जन्माला आले. ते वायूखेरीजच श्वसन करीत होते. सृष्ट्युत्पत्तीची इच्छा ही सर्वांत पहिली निर्मिती होती; परंतु नक्की काय व कसे झाले, हे कोण सांगू शकेल? हा सर्व पसारा कसा उत्पन्न झाला, हे कोण निश्चितपणे जाणत असेल? कारण सर्वच निर्मिती नंतर झालेली आहे, सर्व देवताही त्यानंतरच जन्मलेल्या आहेत. सर्वांचा अधिष्ठाता जो सर्वोच्च स्थानी आहे, तो तरी हे रहस्य जाणतो का, हे नक्की सांगता येत नाही. श्री. प्र. वि. पाठक म्हणतात त्याप्रमाणे, या सूक्तात फार गहन विचार तर्कशुद्ध पद्धतीने मांडले आहेत.

सूक्ताचे उदाहरण (पहिली द्विपदी/ ऋचा):

नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं॒ नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भः॒ किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥ १ ॥

तेंव्हा ना सत्य होते, ना असत्य वायू ही नव्हता आणि त्याच्यावर आकाशही नव्हते.
तसेच रात्र आणि दिवसाचे प्रकटणे नव्हते.सर्वत्र निर्वात पोकळी होती, त्याशिवाय तेथे काहीच नव्हते

bhartiy-tatvadarhan-srushti-utpatti-part-1-inner-blog-img-01

विश्वाच्या उत्पत्तीचे हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीन अनुमान आहे.

यामध्ये विश्वाच्या निर्मितीचे श्रेय परमेश्वराला दिलेले नसून, सर्व देव हे उत्पत्तीच्या नंतर आले आहेत, असे मत मांडले आहे. या सूक्तात विश्वाच्या उत्पत्तीविषयी शंका व्यक्त केल्या आहेत तसेच त्यांची उत्तरे बरोबर आहेत की नाहीत अशाही शंका आहेत. एकमेवाद्वीतीय ब्रह्मामध्ये सर्वप्रथम ‘काम’ म्हणजे इच्छा निर्माण झाल्याने विश्वाचा जन्म झाला आणि पुढे सृष्टी वाढत गेली असा विचार यात मांडला आहे.

सृष्टी कशी उत्क्रांत होत गेली या विषयी “विष्णु पुराणा” मध्ये देखील विस्तारपूर्वक वर्णन केलेले आहे. पुराण म्हणून केवळ हेटाळणीचा सूर न लावता त्याच्याकडे आपल्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा अशा समन्वयक दृष्टीने पाहता येईल. समाजाला सन्मार्ग दाखवण्याच्या उदात्त हेतूनेच अठरा पुराणांची निर्मिती महर्षी वेद व्यासांनी केली असावी. तत्कालीन जीवनपद्धती, मूल्यव्यवस्था आणि जनमानसाचेच चित्रण त्यातून केले असावे.

ही एक प्रकारची Self Help Books होती असे म्हणता येईल का? यामध्ये कालसुसंगत अशा बोधप्रद कथांमधून “पुण्य ते परउपकार, पाप ते पर पीडा” हेच जीवन सूत्र जनसामान्यांवर ठसवले गेलं असावं. ऋग्वेदातल्या नासदीय सुक्तामधली विश्वाच्या निर्मतीची संकल्पना स्तिमित करुन टाकणारी आहे. अती प्राचीन काळापासून आपल्याच या भारतभूमीत असे थोर जिज्ञासू ऋषी होऊन गेले ज्यांनी सृष्टी निमितीचे हे समस्त ज्ञान ग्रहण केले आणि विश्व/ सृष्टीचे उत्पत्ती चक्र उलगडूनही दाखवले. ज्ञानाच्या या विशाल दर्शनापुढे आपण नतमस्तक होतो. शंकराचार्य तसेच मध्वाचार्य यांनी याचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यावर सायण या विजयनगर साम्राज्यातील विचारवंताने, तेराव्या शतकात रचलेली टीका ‘सायणाचे भाष्य’ या नावाने उपलब्ध आहे. सायणाचार्यांनीही आपल्या भाष्यात सूक्ताचा ब्रह्मपरच अर्थ लावला आहे.

या नासदीय सूक्ताचे लोकमान्य टिळक यांनी गद्य भाषांतर केले होते. हिंदी रूपांतर प्रा. वसंत देव यांनी केले आहे. ते भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेत शीर्षकगीत म्हणून वापरले गेले होते. लोकमान्य टिळकांच्या मते, हे सूक्त उपनिषदांतील ब्रह्मविद्येचा आधार आहे. त्यांच्या मते इंद्रियगोचर गोष्टींच्या पलीकडचे असे एकमेव अमृतत्व आहे, हे ओळखणे हेच वेदांतशास्त्राचे रहस्य आहे. या सूक्ताचा उल्लेख प्रसिद्ध नासाचे वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी त्यांच्या Cosmos ह्या पुस्तकात केला आहे.

मुद्दा असा आहे की, निसर्ग आणि मानव यांचे एकरुपत्व, या व्यामिश्र नात्याचे अनेक पैलू, त्याची व्याप्ती आणि खोली याविषयी इतक्या ठाम विश्वासाने व्यक्त केलेली भूमिका जगातल्या इतर कोणत्याही तत्वज्ञानात दिसते? “निसर्ग हाच जीवनाचा आधार आहे” या मूलभूत पायावर आधारलेली प्राचीन भारतीय संस्कृती निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध होती हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच हजारो वर्षे भारतीय भूभाग आणि इथली नैसर्गिक विविधता टिकून राहिली. प्राचीन काळापासून चालत आलेले निसर्ग ज्ञान आणि शहाणपण विसरुन न जाता त्यातील मर्म समजून घेणे हेच श्वाश्वत विकासाचे सूत्र आहे. या अर्थाने भारतीय भूमी, इथला निसर्ग आणि इथली प्राचीन संस्कृती खरोखरच एकमेवाद्वितीय आहे हे मोकळ्या मनाने समजून घेण्याऱ्याला याविषयी यत्किंचितही संदेह वाटत नाही.

पुढील लेखात आपण सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी भारतीय तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ महर्षी कणाद यांचे “वैशेषिक सूत्र” या ग्रन्थातून व्यक्त झालेले विचार जाणून घेणार आहोत.

 

संदर्भ :


  • काशीकर, चिंतामणी गणेश; सोनटक्के, नारायण श्रीपाद, संपा. सायणभाष्यासह ऋग्वेद, चौथा खंड, वैदिक संशोधन मंडळ, पुणे,१९४६.
  • शास्त्री, हरिदत्त; कृष्णकुमार, ऋक्सूक्तसंग्रह, साहित्य भण्डार, मेरठ,१९९६.
  • नासदीयसूक्ताचे परिशीलन, प्र. वि. पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *