Facets
Spiti Valley : Everything is Beautiful #3
spiti-valley-blog-3-img

सकाळी खोलीतुन समोर किन्नर कैलास चे दर्शन झाले. सुर्योदय पर्वताच्या पाठीवर होतो. किन्नर कैलासची भव्यता डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. नुसतं दर्शन देखील गुढ व गंभीर आहे. पाठीवर होणारा सुर्योदय अप्रतिम सौंदर्याचा साक्षात्कार होता. नमस्कार करून गावात चक्कर मारली. दुतर्फा सफरचंदाच्या बागा आहेत. छोटी फळं लगडलेली होती. फक्त फोटोच्या उपयोगाची. कारण ही फळं तयार होण्यासाठी चार पाच महिने लागतील. किन्नर कैलासच्या दिशेने जाणारी वाट चढाईची होती. या भागातील स्थानिक लोक दररोज सतत डोंगर चढत, उतरत असतात. आपल्यालाच दमायला होतं. पहाटे साडेचार पाच वाजता लक्ख उजाडले व रात्री आठ पर्यंत उजेड असतो. आपल्याला जे कष्ट वाटतात ते त्यांचं नित्य जीवन आहे. तरीही सगळेजण आनंदी असतात. गावात शेतीची कामं करायला निघालेले स्थानिक होते.

चिटकुल. ११३१२ फुट उंचीवर वसलेले हे विनापरवाना जाता येणारे भारताच्या सीमे जवळचे शेवटचे गाव. जसे बद्रीनाथ जवळचे माणा. भारतातील शेवटचा ढाबा. तसेच भारतातील सर्वात स्वच्छ हवा असणारे गाव. एक हजार पेक्षा कमी लोकवस्ती. संगला पासून २२ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हा सर्व भागच श्रीमंत लोकांचा आहे. बहुतांश घरे लाकडी आहेत. अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांची लाकडे पुर्वी एका घरासाठी काही जणांनी वापरली होती. आता घरांसाठी लाकडे वापरायला कायद्याने बंदी घातली आहे. जंगल वाचविण्यासाठी. बातसेरी, खारोगला, रक्छाम, मस्त्रंग ई. गावे घाटातून दिसतात. या भागात देखील पांडवांनी किन्नर रुपात अज्ञातवासात वास्तव्य केले होते. जशी पाच पांडवांची एक द्रौपदी होती, तशीच प्रथा या भागात काही जमातींमध्ये आहे. पांडवांच्या काळा पासून. भारतात अजूनही काही जमातींमध्ये सुध्दा आहे. दोन भावांमध्ये एकच पत्नी असते. कुटुंब विभक्त होऊ नये व जमिनीची वाटणी होऊ नये म्हणुन ही प्रथा आहे. आधीच शेतीसाठी उपलब्ध व उपयुक्त जमिन कमी आहे. त्यात सहा महिने बर्फ असतो.

सांगला ते चिटकुल (11320 फुट ) रस्ता अत्यंत रमणीय आहे. बास्पा नदी फार सुंदर दिसते. घाट रस्त्यावर वस्ती नाही. पण व्हॅली मधे वस्ती व बागा, शेती आहे. बातसेरी, राक्छम येथे कॅंप आहेत. चिटकुल मधे प्रवेश करतानाच समोर बास्पा नदी व समोर P6447, P6465, P5655 शिखरे दिसतात. ईथे एक बौद्ध गुंफा आहे. या बौद्ध गुंफेत शाक्य मुनींची पुरातन मुर्ती आहे. थोडा चढ चढावा लागतो. पण आम्ही चढून गुंफे जवळ पोहोचलो तेव्हा समजले की गुंफा दुपारी बंद असते. पॅगोडा प्रकारची गुंफा आहे. एवढेच समजले. ईथे मठी मंदिर आहे. जे पाचशे वर्षे जुने आहे. भगवान बद्रीनाथ यांची पत्नी मां मठी Maa Mathi या भागाचे म्हणजे किन्नौर व्हॅली चे रक्षण करतात. स्वतः बद्रीनाथ सांगला मधे रहातात. स्थानिक लोक दरवर्षी मां मठीची पालखी, पायी, बद्रीनाथ येथे घेऊन जातात. डोंगर शिखरावरुन ही पालखी जाते. ईथेच अजून दोन मंदिरे आहेत. पण आम्हाला एकही दर्शन घेता आले नाही.

एक पाऊल वाट बास्पा नदीच्या पात्रात जाते. आपला बराच वेळ यैथे फोटो काढण्यात जातो. नदीच्या पुलावरून देखील बरेच छान फोटो येतात. ईथे गावात पाण्यावर चालणारी गिरणी आहे. अशी गिरणी हिमालयात बऱ्याच ठिकाणी असतात.

चिटकुल हे किनौर कैलास परीक्षेतील शेवटचे गाव आहे. तसेच रुपीन पासचा ट्रेक ईथेच येतो. चीन व अफगाणिस्तान चे व्यापारी याच मार्गाने पुर्वी भारतात व्यापारासाठी येत होते.

सांगला मधे संध्याकाळी आम्ही बद्रीनाथ मंदिर व कामरू किल्ला पहायला गेलो. पंधरा वीस मिनिटे चढावे लागते. ईथेही मंदिरे बंद होती. म्हणून आम्ही किल्ला पहायला गेलो. तर त्याचे दरवाजे देखील बंद. म्हणून चौकशी केली. नशीबाने जवळपास कोणीतरी होते चौकशी करायला. मग मुख्य दरवाजा उघडून आत गेलो. व आतले दार वाजवले. मग आतून आवाज आला. ब्रह्म कुमार नावाचे सुरक्षारक्षक होते. म्हणून किल्ला पहायला जाऊ शकलो. लाकडी बांधकाम आहे. तिसऱ्या मजल्यावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. ही मुर्ती गुवाहाटी हून आणली होती. कामाख्या देवीचे दुसरे नाव कामरुप देवी आहे. म्हणून या देवीला कामरू असे म्हणतात. पण ही मुर्ती पहायला आपण वरती जाऊ शकत नाही. बुशहर राजघराण्याची ही राजधानी होती. नंतर ही राजधानी सराहन व त्यानंतर रामपुर येथे गेली. १५ व्या शतकातील बद्रीनाथ मंदिर आहे. आम्ही उतरताना परत मंदिराकडे गेलो. या देवळातील मूर्ती येथील जत्रे नंतर गंगोत्री येथे नेली जाते. हिमालयातील लोकांच्या क्षमतांचा आपण अंदाजच घेऊ शकत नाही. या ठिकाणाहून किन्नर कैलास देखील खुप भव्य व जवळ दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *