Ancient Indian Science
भारतीय तत्वदर्शन आणि सृष्टीची उत्पत्ती : भाग २
bhartiy-tatvadarhan-srushti-utpatti-part-2

“निसर्गाकडे बघण्याचा सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टिकोन ज्या सरांकडून मिळाला त्या आदरणीय गोळे सरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून ही लेखमाला लिहिलेली आहे.”

वैशेषिक सूत्र

मागच्या भागात आपण सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी प्राचीन भारतीय तत्वदर्शनातील ऋग्वेदातील नासदीय सुक्तात मांडलेल्या सिद्धांताविषयी बघितले. नासदीय सूक्त जितके प्रसिद्ध आहे त्यामानाने, भारतीय तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ महर्षी कणाद यांचे “वैशेषिक सूत्र” हे फारसे माहिती नसते. या ग्रंथामध्ये वेदांचे प्रामाण्य मान्य करुन सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी अगदी तर्कसंगत असे विचार मांडलेले आहेत. दहा प्रकरणांमधून ३७३ सूत्रे मांडलेली असून, या सूत्रांमधून विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ “अणू” (atom) असल्याचे प्रतिपादन केलेले आहे. हे सम्पूर्ण विश्व म्हणजे निरनिराळया आकारांमध्ये अणूंचे प्रकटीकरण आहे. (This whole world is a manifestation of atoms in different shapes. Atomicity is the foundation of eternity. Its magnitude reflects in the perception of the atom. 7.1.8 )

‘दर्शन’ या शब्दाचा या संदर्भात तत्वज्ञान असा अर्थ आहे. सहा आस्तिक दर्शनांपैकी हे एक दर्शन आहे. याचे मूळ प्रणेते कणाद महर्षी आहेत. विश्व अणूंचे बनलेले आहे, हा या दर्शनाचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. एक घट दुसऱ्या घटाहून भिन्न असतो, याचे कारण त्यांचे अणू निराळे असतात. पण एक अणू दुसऱ्या अणूहून भिन्न कसा? याचे उत्तर त्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक विशेष असतो हे आहे. ‘विशेष’ हा स्वतंत्र पदार्थ मानला म्हणून या दर्शनाला ‘वैशेषिक’ दर्शन असे नाव आहे. विश्वात एकूण किती पदार्थ आहेत, असा प्रश्न त्यांनी तत्त्वचिंतक या नात्याने विचारला. पदार्थ म्हणजे ‘जे जे शब्दाने वाच्य आहे ते ते म्हणजेच जे काही आहे ते’ एकूण सर्व. कणादांच्या सूत्रात सहा पदार्थ सांगितले आहेत. पण पुढे ‘अभाव’ या सातव्या पदार्थाची भर घातली. कारण ‘नसणे’ यालाही अर्थ आहेच.

ते सात पदार्थ म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामन्य, विशेष, समवाय आणि अभाव हे होत. कणाद महर्षींनी आपले तत्त्वज्ञान सूत्ररूपांनी सांगितले. हे द्रव्य नऊ प्रकारचे आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक, आत्मा, आणि मन अशी नऊ द्रव्ये आहेत. या द्रव्यांचे निरनिराळे गुण आहेत. द्रव्यांचे हे गुण चोवीस प्रकारचे आहेत. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, सुरूत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार असे हे चोवीस गुण आहेत.

द्रव्य व गुण यानंतरचा तिसरा पदार्थ म्हणजे कर्म आहे. उत्क्षेपण (वर फेकणे), अपक्षेपण (खाली फेकणे), आकुंचन (संकुचित करणे), प्रसारण (पसरणे) व गमन ही पाच कर्मे आहेत. सामान्य हा चौथा पदार्थ, जे अनेक ठिकाणी राहते पण एक असते आणि नित्य असते ते सामान्य होय. पाचवा पदार्थ विशेष होय. सगळी अविनाशी म्हणजे नित्य द्रव्ये ही विशेषयुक्त असतात. म्हणजे त्यांचा वेगळेपणा कायम राहतो. म्हणून हा वेगळेपणा वैशेषिक दर्शनातील महत्त्वाचा पदार्थ आहे. म्हणून वैशेषिक दर्शन हे नाव या तत्त्वज्ञानाला प्राप्त झाले. समवाय हा सहावा पदार्थ. सातवा पदार्थ अभाव होय. वरवर पहिले तर केवळ एका वाक्याची सूत्रे असली तरी त्यामध्ये अतिशय गहन असा अर्थ सामावलेला आहे. सूत्र म्हणजे Condensed Form मध्ये व्यक्त केला सखोल आणि व्यापक आशय. याला आपण “गोटीबंद आशय” असं म्हणू या. सूत्र रुप हे संस्कृत भाषेचे हे अत्यंत श्रेष्ठ असे गुण वैशिष्ट्य आहे.

उदाहरणार्थ,

सदरकारणंवनित्यम् l तस्य कार्यं लिंगम् ||
The fundamental existence of this nature is uncaused, it’s eternal. The atom is the proof of this argument. – वैशेषिक सूत्र 4.1.1& 2

संयोगाभावे गुरुत्वात् पतनम् ||
On disjunction, an object falls down, due to its own mass (Gurutva) वैशेषिक सूत्र 5.1.7

नित्यं परिमंडलम् ||
That which is eternal (atom-अणू ) is spherical ७.१.२०

महर्षी कणाद गुरुत्वाकर्षण, अणू यांपासून उत्पन्न झालेल्या मानवी जीवनाबद्दलच केवळ भाष्य करुन थांबत नाहीत तर त्या जीवनातली नैतिकता, मूल्ये यांवर आधारीत कल्याणकारी अशा शाश्वत जीवनशैली विषयी देखील सूत्रबद्ध विचार मांडतात. या सूत्रांचे तात्पर्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रयोगाने प्रगती आणि भरभराट साधता येते, अनुभवता येते. आता बोला! आहे की नाही थक्क करुन टाकणारे तत्व? चतुर्विद पुरुषार्थानुसार प्रयोग आणि अनुभवसिद्ध असे संपन्न जीवन व्यतीत करता येते हे महर्षींनी सांगून ठेवले आहे! कधी? तर, किमान चार हजार वर्षांपूर्वी!

आज ज्या गोष्टीला Rationality, Realism म्हणून आधुनिक मानले जाते त्याचे सम्पूर्ण विवेचन वैशेषिक सूत्रांमधून कधीचेच नमूद करुन ठेवलेले आहे. शिवाय ते देखील शाश्वत विकासाचे सूत्र! आजच्या सारखे निसर्ग ओरबाडून, त्याचे अपिरिमित नुकसान करुन नव्हे! विकासाचा हा खऱ्या अर्थाने चिरस्थायी, शास्त्रीय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे. अनुभव आणि प्रयोगशिलता हा या सूत्राचा गाभा आहे. (Experience and Experimentation is the core of this philosophy.)

व्यावहारिक (उपयुक्त) विज्ञान आणि मूलभूत विज्ञान (Applied Science & Absoulte Science) यामध्ये मौलिक फरक असून चालणार नाही. हेच तत्वज्ञान या सूत्रांमध्ये आवर्जून सांगितलेलं आहे. आणि आधुनिक पाश्चिमात्य विज्ञानाची नेमकी इथेच गल्लत झाली आहे हेच आज दिसत आहे. कोणतीही वैज्ञानिक प्रगती त्यातून उदभवणाऱ्या परिणामांचा विचार करीत नाही. कोणत्याही शोधाचे सर्व जगावर काय परिणाम होतील हा विचार आधी केला जात नाही. त्याचे दुष्परिणाम मात्र सर्व जगाला भोगावे लागतात. अणूबॉम्ब पासून करोना व्हायरस चा महाभयंकर उद्रेक होणे या गोष्टी याच अविवेकी ज्ञानाचे विद्रुप परिणाम आहेत.

सृष्टीविषयी व्यापक दृष्टी आणि सखोल आकलन नसल्यामुळेच आज विज्ञान शिक्षणात “माणूस हा पंचामहाभूतांपासून बनलेला नसून तो वेगवेगळ्या Gases पासून बनलेला आहे” असं जर सांगितलं जात असेल तर या उथळ आणि बालिश विधानापुढे काय बोलणार? पंचमहाभूतांमधील “वायू” म्हणजे निराळे काय असते मग? वायू याचा अर्थ फक्त वारा नसून जे काही वायू रुप आहे ते सर्व घटक! पण जे जे पाश्चात्य ते आणि तेवढेच उद्दात्त अशी काही अंशी समजूत झाली आहे. यालाच “आधुनिक शिक्षण” असे म्हणण्याची पद्धत आहे! आजच्या पुस्तकी विज्ञान शिक्षणात निसर्गाची खरी ओळखच नाही, मग त्याची व्याप्ती आणि खोली कुठून येणार? मात्र निसर्ग आकलना शिवाय असलेले शिक्षण हे खरे शिक्षण नाही याचे भान देखील नाही! मग हे आकलन होणार तरी कसं?

मानवी जीवनासाठी सदा सर्वकाळ मार्गदर्शक असलेले भारतीय तत्वदर्शन मुळातून समजून घेण्यासारखे आहे. त्यामुळे सध्याची पाश्चात्य विचारांचा प्रभाव असलेली फक्त मनुष्य केंद्रित विकासाचा विचार करणारी शिक्षण पद्धती, विचारसरणी, जीवनपद्धती यामधल्या समस्या ठळक दिसू लागतात आणि त्याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात.

bhartiy-tatvadarhan-srushti-utpatti-part-2-inner-blog-img-01

या पार्श्वभूमीवर, आमचे आचार्य म्हणायचे ते सर्व आठवतंय. ते म्हणायचे, इथला भूगोल, इतिहास हा निसर्गाच्या दृष्टिकोनातून शिकवला गेला पाहिजे. Eco School, Eco College, Eco University अशी संकल्पना त्यांनी मांडली होती आणि अनेक चर्चासत्रे देखील आयोजित केली होती. त्यामध्ये गुरुकुलातील सर्व जण अतिशय उत्साहाने सहभागी होत असत. आचार्य म्हणायचे की, निसर्गाचे नीट संगोपन केले तर निसर्ग माणसाला काहीही कमी पडू देत नाही. निसर्गपूरक आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारली तर कशाला लागतील इतकी हॉस्पिटल्स? ती लागणारच नाहीत अशी पर्यावरणपूरक जीवनशैली विकसित करायला हवी!आज कोविड समक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या जगाला अशा निरोगी जीवनशैलीची किती आवश्यकता आता जाणवते आहे ना? प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व समजले आहे.

निसर्गाकडे फक्त उपभोगाच्या दृष्टीने न पाहता, “विश्वाचा जीवनाधार” या दृष्टीने पहाणे आवश्यक झाले आहे. निसर्गाबरोबर सूर जुळवून घेऊन समाधानाचे जीवन कसे जगायचे याविषयीचे उत्तम ज्ञान आपल्याच भूमीत उपलब्ध आहे. विस्मृतीत गेलेले हे ज्ञान पुन्हा आत्मसात करण्याची आवश्यकता आजच्य काळात निर्माण झालेली आहे. त्यासाठी वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून भारतीय निसर्गाकडे भारतीय दृष्टीने बघण्याची गरज आहे. जगावर कोसळलेल्या महासंकटामुळे विकासाच्या आधुनिक दृष्टिकोनावर भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.

पाश्चिमात्य विज्ञान, विचारसरणी, जीवनपद्धती म्हणजेच अंतिम सत्य नव्हे हे समजून घ्यायला हवे. केवळ दोनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या या पद्धतीत अनेक दोष आणि त्रुटी आहेत. हे लक्षात घेऊन, त्यामध्ये ठामपणे बदल करण्याची गरज आहे. या निमित्ताने सुज्ञपणे विचार करणार्यांनी, मानवी प्रगती म्हणजे नेमकं काय याचा पुन्हा एकदा शाश्वत दृष्टीने विचार केला तर?

प्राचीन भारतीय तत्वदर्शन आणि सृष्टीचा विकास आणि आधुनिक विज्ञानची दिशा व सद्यस्थिती, मानवी जीवनातील अस्थिरता याविषयी पुढच्या भागात बोलू.

 

संदर्भ :


  • The Vaisesika sutras of Kaṇada, with the commentary of Sankara Misra and extracts from the gloss of Jayanarayaṇa
  • Project Shivoham
  • मराठी विश्वकोश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *